आम्ही जेवायला बसलो होतो. संध्याकाळचे एकत्र जेवण. अस्मादिक, बायको व मुलगा एकत्र जेवायला बसले की एकत्र जेवण असे म्हणायचे. आता एकत्र कुटुंब राहिलेले नसले, तरी जेवण एकत्र असते. पुढच्या पिढीत त्यालाही फाटा फुटेल कदाचित. विविधभारतीवर लागलेल्या “मेरी मा” हे “तारे जमीन पर” ह्या चित्रपटातले गाणे ऐकताना, एकदम माझ्या आठवणीची तार लताच्या “प्रेमा स्वरूप आई” ह्या गाण्याशी जोडली गेली. जेवता जेवता क्षणभर खूप वर्षांपूर्वीचा गोड्या मसाल्याचा तोच घमघमाट नाकात दरवळळ्याचा भास झाला. आई जाऊन बरीच वर्ष लोटली होती. तरी सुद्धा घटकाभर आई स्वैयंपाकघरात वावरत असल्या सारखे वाटून, बायकोला म्हणालो, “बऱ्याच दिवसात कांद्याच्या पातीची भाजी खाल्ली नाही गं, एकदा करना”. कांद्याच्या भाजीचे नाव ऐकून शेजारी बसलेल्या माझ्या मुलाने भुवया उंच करत वेडेवाकडे तोंड केले. मी दुर्लक्ष केले. हल्लीच्या पिझ्झा व नूडल्स संस्कृती मध्ये मुलांसमोर पडवळ, दुधीभोपळा, लालभोपळा, घोसाळी, दोडकी, कार्ली, शेपू, लालमाठ अशा भाज्यांची नावे काढायची सुद्धा लाज वाटते. भाज्यांना सुद्धा जणू काही हल्ली स्टेटस आलेला आहे. त्यात मश्रुम्स, पनीर, फ्लॉवर असले वरिष्ठ आधीकारी पंगतीला हजर राहायला लागले आहेत. कांद्याच्या भाजीचा माझा प्रस्ताव मंजूर झाला व दोनचारच दिवसात जेवणात कांद्याच्या पातीची भाजी खायला मिळाली. छान चविष्ट झाली होती. मी बायकोचे भरभरून कौतुक करून आभार मानले. महाराष्ट्राबाहेर बरेच दिवस काढल्यावर कळते की अशा भाज्या बाजारात नेहमी मिळतातच असे नाही आणि म्हणूनच त्यांचे एवढे अप्रूप. मी कांद्याच्या पातीची भाजी बोटंचाटत खाल्ली, मुलाने तोंडंकरत खाल्ली.

जेवण झाल्यावर पेपर वाचत गादीवर पडलो होतो. मनात विचार आला, आजची भाजी छान झाली होती, पण मला लहानपणी आवडायची तेवढी आज आवडली नव्हती. माझ्या लहानपणीची ती मजा नव्हती. मी नकळत आईच्या केलेल्या भाजीची चव शोधत होतो, ती सापडत नव्हती. आईची कांद्याच्या पातीची भाजी काही अफलातून व्हायची नाही. पण आई भाजी करायची, त्याची चव अंगवळणी पडली होती व आवडायची. साधाच आमटी, भाजी भात पोळ्यांचा स्वयंपाक रोज असायचा, ठरलेल्या वेळी गोड्यामसाल्याचा वास यायचा, कुकरच्या शिट्ट्या होऊन भात शिजल्याचा वास यायचा. कधी कधी “कुकर बंद कर रे” अशी आईची हाक यायची. अभ्यास करता करता आम्ही असल्या हाकांची वाटच बघायचो. त्यानिमित्ताने पुढची दहा मिनिटे अभ्यासातून मोकळीक. दुपारी बाराची शाळा असायची व आम्ही अकरा वाजता जेवायला बसायचो. सोबत किडमूड्या रेडिओवरून विविधभारतीवरच्या “रंगतरंग” कार्यक्रमात लागलेली मराठी किंवा हिंदी गाण्यांची रेलचेल ऐकायला मिळायची. घर छोटे असल्या कारणाने आमचा अर्धा वेळ स्वैयंपाकघरातच जायचा. आईच्या बांगड्यांचा पोळ्या लाटताना येणारा आवाज सगळे ठीक चालले आहे ह्याची मनातल्या मनात ग्वाही द्यायचा. अभ्यास करताना एक कान स्वयंपाकघरात घडणाऱ्या गोष्टींवर व नाक भाजी शिजल्यावर सुटणाऱ्या वासावर सतत असायचे. आज खरेतर कांद्याच्या पातीच्या भाजीच्या चवीपेक्षा मला त्या लहानपणच्या दिवसांची आठवण येत होती. लहानपणाचे ते घरातले वातावरण व ती चव मनाच्या कोपऱ्यात बसली होती व आजच्या भाजीत मी तीच चव पुनः शोधायचा प्रयत्न करत होतो. भाजीची चव जरी मिळतीजुळती होती तरी, पूर्वीचे ते वातावरण मिळतेजुळते नव्हते. आजच्या जेवणात खाल्लेली कांद्याच्या पातीची भाजी मनापासून आवडली नाही ते बरेच झाले, त्यामुळे मला काळात मागे जाऊन पूर्वीच्या त्याच स्वयंपाकघरात आईच्या हातचे जेवण जेवून, तृप्त होऊन परत येता आले होते.

DISCLAIMER:
THE VIEWS AND OPINIONS EXPRESSED IN THIS ARTICLE ARE THOSE OF THE AUTHOR AND DO NOT REFLECT THE VIEWS OF SPEAKIN, ITS MANAGEMENT OR AFFILIATES. SPEAKIN MAKES NO REPRESENTATION AS TO ACCURACY, COMPLETENESS, CORRECTNESS, SUITABILITY OR VALIDITY OF ANY INFORMATION ON THIS ARTICLE AND WILL NOT BE LIABLE FOR ANY ERRORS, OMISSIONS OR DELAYS IN THIS INFORMATION OR DAMAGES ARISING FROM ITS DISPLAY OR USE

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Show Buttons
Hide Buttons